चोपडा | प्रतिनिधी
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात विशेष पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी व नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने मोहिमेची सर्व तयारी पूर्ण केली आहे.
मोहिमेसाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय रुग्णालये, बसस्थानके आदी ठिकाणी २७४ पोलिओ बूथ उभारण्यात आले असून ७५७ आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका कार्यरत राहणार आहेत. तालुक्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २९,६९६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २०,७२१ तर शहरी भागातील ८,९७५ बालकांचा समावेश आहे.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ५८ सुपरवायझर, ८ तालुका पर्यवेक्षक आणि १५ जिल्हास्तरीय निरीक्षक देखरेख ठेवणार आहेत. तसेच सर्व आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांना प्रत्यक्ष आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशिक्षण देण्यात आले असून, सर्व पात्र बालकांचे सर्वेक्षण करून यादीही तयार करण्यात आली आहे.
२८ जून रोजी बूथवर येऊ न शकलेल्या बालकांसाठी ग्रामीण भागात पुढील ३ दिवस, तर शहरी भागात ५ ते ७ दिवस घरोघरी भेट देऊन पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत.
तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ व पाड्यांवरील एकही बालक डोसपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
"बाळ आजारी असले तरीही पोलिओचा डोस पूर्णपणे सुरक्षित आहे. प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत."
— डॉ. गिरीश गोसावी, तालुका आरोग्य अधिकारी, चोपडा
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुका आरोग्य सहाय्यक विजय देशमुख, हिवताप पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर तसेच उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तक आणि आशा सेविका परिश्रम घेत आहेत.

Social Plugin