तीन दिवसांत सायकलीने करणार ४८५ किमीचा प्रवास; आरोग्य, पर्यावरण आणि भक्तीचा संदेश
जळगाव, दि. ९ जुलै : जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (दि. ९ जुलै) रोजी पहाटे साडेपाच वाजता आकाशवाणी चौकातून या सायकल वारीला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण म्हणजे जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्वतः सायकल चालवत या वारीत सहभाग नोंदवला.
जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे सदस्य एकूण ४८५ किलोमीटरचा प्रवास तीन दिवसांत पूर्ण करून शनिवार, दि. ११ जुलै रोजी संध्याकाळपर्यंत पंढरपूर येथे पोहोचणार आहेत. वारीच्या प्रस्थानावेळी महापौर दीपमाला काळे यांच्यासह सर्व सायकलिस्टांना निरोप देण्यासाठी जळगावकरांनी मोठी गर्दी केली होती. महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून सर्व सहभागींचे स्वागत व सत्कार केला. राष्ट्रगीत गायनानंतर विठ्ठल नामाच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात सायकल वारीला प्रारंभ झाला.
यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी सायकल वारीचे महत्त्व सांगताना ही केवळ धार्मिक यात्रा नसून आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारी चळवळ असल्याचे नमूद केले. "लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आस प्रत्येक वारकऱ्याला असते. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी सायकलने पंढरपूर गाठण्याचा संकल्प केला आहे. सायकल वारी हे माझ्यासाठी भक्तीबरोबरच आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे माध्यम आहे," असे त्या म्हणाल्या.
महापौर काळे यांनी सांगितले की, जळगाव शहराच्या प्रथम नागरिक म्हणून गेल्या १५३ दिवसांपासून काम करताना त्यांनी आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण या विषयांना प्राधान्य दिले आहे. नियमित सायकल चालविल्याने शारीरिक तंदुरुस्ती राखली जाते, इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे नागरिकांनीही शक्य तेथे सायकलचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.
पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या चरणी संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या समृद्धीसाठी, शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी आणि जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. "स्वच्छ, सुंदर आणि हरित जळगाव घडविण्यासाठी आम्ही हाती घेतलेल्या विकासाच्या संकल्पाला विठुरायाचे आशीर्वाद लाभावेत, हीच माझी प्रार्थना आहे," असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारी ही सायकल वारी जळगावकरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, विठ्ठल भक्तीचा उत्साह आणि सायकल संस्कृतीचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळत आहे.

Social Plugin