चोपड्यात LCB ची धडक कारवाई; आंतरजिल्हा टोळी जेरबंद

 



जळगाव | प्रतिनिधी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि चोपडा शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत एक गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक Hyundai EON कार असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दिनांक १ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, काही इसम कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर–चुंचाळे मार्गे चोपड्याकडे येत आहेत. त्यानुसार LCB व चोपडा शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने चोपडा–लासूर–चुंचाळे रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला.

सायंकाळी सुमारे ७:३० वाजता संशयित Hyundai EON (MH 20 EE 6103) कार अडवून पंचांसमक्ष झडती घेतली असता, मागील सीटखाली एक गावठी कट्टा, एक मॅगझिन आणि एक अतिरिक्त मॅगझिन आढळून आले. तसेच आरोपींकडून तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.

अटक आरोपी

ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (वय ३९), रा. कुऱ्हाड खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव

सचिन रोशन पवार (वय ३४), रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

अनिल कचरे साळुंखे (वय ३७), रा. जाधव गल्ली, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

जप्त मुद्देमाल

गावठी कट्टा (पिस्तूल) व मॅगझिन – ₹६०,०००

अतिरिक्त मॅगझिन – ₹१०,०००

Hyundai EON कार – ₹५,००,०००

Oppo, Vivo व Redmi कंपनीचे ३ मोबाईल – ₹३०,०००

एकूण जप्त मुद्देमाल : ₹६,००,०००

याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २८५/२०२६ भारतीय हत्यार कायदा (Arms Act) कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा शहर पोलीस करत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.